श्रीरामदेव-वीरविट्ठल-मुख्यप्राणाः सुप्रसन्नाः सन्तु ।
ब्रह्मान्ताः गुरवः साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः ।
आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि ॥
गोकर्ण-पर्तगाळी-जीवोत्तम मठाचे आठवे पीठाधिपति श्रीमद्रघुचन्द्र तीर्थ श्रीपाद वडेर यांचे आज पुण्यदिन. या निमित्ताने त्यांच्या विषयी थोडे जाणून घेवूया :
श्रीरघुचन्द्र तीर्थ श्रीपादांचे गुरु श्रीमद्दिग्विजयरामचन्द्र तीर्थ श्रीपाद वडेर हे थोर तपस्वी होते. त्यांच्याच कारकीर्दित पर्तगाळीला रथोत्सव सुरु झाला. त्यांनी काही काळ ऋषिवन (सद्य रेवण/रिवोणा) येथे राहून तिथल्या गुहेत तपश्चर्या केली आणि अंकोल्याला समाधिस्थ झाले.
अशा दैदीप्यमान गुरूंचा वारसा घेऊन श्रीरघुचन्द्रतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज ख्रिस्त शक १६६९ च्या मार्च महिन्यात गुरुपीठावर आले. त्यांनी काही काळ गोकर्ण येथील मठात निवास करून श्रीजीवोत्तमतीर्था श्रीपादांनी स्थापन केलेल्या तेथील भूविजय विट्ठल तसेच संस्थानाच्या वीरविट्ठलाची उपासना केली आणि पुढे तीर्थ यात्रेसाठी उत्तरेकडे प्रयाण केले.
उत्तरेत ते पोहोचले ते वाराणासी (काशी) क्षेत्री, जिथे मठाचे आद्य गुरु व पहिले ‘वडेर’ असलेल्या श्रीमन्नारायणतीर्थांनी स्थापन केलेल्या मूल मठाची वास्तू आजही आहे. त्या पुरातन वास्तूचा श्रीस्वामींनी त्याकाळी जीर्णोद्धार केला. काशीत निवास करत असताना स्वामींनी भागिरथीत स्नान करून श्रीबिंदुमाधवाचे नित्य पूजन केले. तदनंतर वाटेत अनेक तीर्थक्षेत्रांस भेट देत व सिद्धांताचा प्रचार करीत स्वामी गोकर्णास परतले.
गोकर्ण क्षेत्री आल्यावर स्वामीजींनी मठाच्या इतिहासात अभूतपूर्व असे कार्य आरंभिले. उडुपीत श्रीमदाचार्य, म्हणजे श्रीमध्वाचार्यांनी जसे अष्ट मठ उभारले, तसेच अष्टमठ उभारण्याचा श्रीमद्रघुचन्द्रतीर्थ गुरुवर्यांचा मानस होता. त्यानुसारे त्यांनी ४ सुयोग्य वटूंना संन्यास दीक्षा देऊन आपले शिष्य करून घेतले. परंतु ईश्वराची इच्छा वेगळीच होती. परमात्मा श्रीहरिनें स्वप्नात दर्शन देऊन स्वामींना हे कार्य पुढे न नेण्याचा आदेश दिला आणि स्वामींनी त्याचा अवलंब केला. कालांतराने चौघांतील एक शिष्य हरिपादी विलीन झाले. तिसरे शिष्य श्रीसंयमींद्र तीर्थ पुढे काशीच्या मूल मठी राहिले आणि काशीच्या राजाने त्यांचा सत्कार केला.
स्वामींचे द्वितीय शिष्य श्रीव्यासतीर्थ यांनी गुरु स्वामींना त्यांच्या ज्येष्ठ शिष्य श्रीलक्ष्मीनारायण तीर्थांना पुढे गुरुपीठाचा अधिकार देण्याची विनंती केली आणि स्वतः आजन्म पर्तगाळीत राहून स्वसाधना, अध्यापन सुरु ठेवून मठाचा कार्यभार सांभाळत राहिले. पर्तगाळीलाच त्यांचे वृंदावन आहे. यानुसार श्रीस्वामींनी निजशिष्य श्रीलक्ष्मीनारायण तीर्थांचा पट्टाभिषेक केला. याच श्रीलक्ष्मीनारायणतीर्थांनी पुढे मठाच्या गुरुपरंपरेस कसे नव्या उंचीस नेले व बडोद्यातील त्यांच्या कार्याविषयी आपण वाचलेच असेल.
शिष्याच्या पट्टाभिषेका नंतर लोक कल्याणार्थ, धर्म प्रचारार्थ व समाज सशक्तीकर्णार्थ स्वामी श्रीमद्रघुचंद्र तीर्थ श्रीपाद वडेरांनी प्रवास सुरु ठेवला. अशाच एका प्रवासात उत्तर कन्नडातील होन्नावर गावी राम मंदिरात निवास करत असताना ईश्वर इच्छा झाली आणि श्रीशके पौष शुक्ल १५ दुंदुभी नाम संवत्सरात (ख्रि. शके २-१-१६८३) स्वामींनी वृंदावन प्रवेश केला. सद्भक्तांचा उद्धार करत आजही ते वृंदावन होन्नावर ला आहे.
गुरुवर्यांचा महिमा व थोर व्यक्तिमत्त्वाविषयी थोडक्यात जाणून घ्यायचे असेल, तर कोंकणाभ्युदयकार श्री सागर रामाचार्यांचे पुढील श्लोक निश्चितच स्मरणीय ठरतात. हे श्लोक श्री. गिरीश प्रभु यांनी इंग्रजी व कानडी अनुवादासहित पुरवले यासाठी त्यांचे विशेष आभार. मला प्राप्त झालेल्या अनुवादाचा आधार घेऊन इंग्रजी अनुवादाचा पुन्हा मराठीत शाब्दिक अनुवाद न करता थेट मूल संस्कृत श्लोकाचाच यथाबुद्धी भावानुवाद पुढे देत आहे. जाणत्यांनी दोषांचे निवारण करून माझे मार्गदर्शन अरावे अशी विनंती.
__________
१) सागर रामाचार्य रचित सुनिती भागवतात आलेले गुरु श्रीरघुचंद्रतीर्थांचे वर्णन—
गोकर्णसत्क्षेत्रवरेऽनवद्यः श्रीविट्ठलं कोङ्कणविप्रवन्द्यः।
अपूजयद्यो रघुचन्द्रतीर्थः सञ्जुष्टगङ्गादिसमस्ततीर्थः ॥
यतीश्वराद्योऽखिललोकहृद्यो विरक्तिभूषः परिभूतदोषः ।
शास्त्राब्धिचन्द्रो हरिभक्तिसान्द्रो भवेत्प्रसन्नः परमो गुरुर्नः ॥
जो दोषरहित असून सर्व कोंकणी ब्राह्मणांसाठी पूज्य आहे, जो गोकर्ण या पुण्य क्षेत्रात राहून श्रीविट्ठलाचे पूजन करीत असे, ज्याने गंगादि समस्त तीर्थक्षेत्रांना भेट दिली, जो संन्यासांमधे श्रेष्ठ आहे, ज्याच्या साठी अखिल लोकाच्या हृदयात प्रेम भरलेले आहे, ज्याच्या साठी त्याची वरक्ति हेच त्याचे भूषण आहे, ज्याने (काम, क्रोधादि) सर्व दोषांना पराभूत केले आहे, जो शास्त्र सागरात चंद्राप्रमाणे झळकत आहे, ज्याची भक्ती श्रीहरि ठायीं एकनिष्ठ आहे, असा तो परम गुरु श्रीरघुचंद्र तीर्थ आमच्या वर प्रसन्न होवो.
२) सागर रामाचार्य रचित सन्नीती रामायणात आलेले गुरु श्रीरघुचंद्रतीर्थांचे वर्णन—
सन्तापं शमयन्तमांस्यपहरन्गोभिर्जगज्जीवयन्
सत्कामं परिपूरयन्खलगणान्विद्रावयन्मायिनः ।
शान्तिं साधु भजन्ननन्तकुमुदाद्यार्तिं च सन्नाशयन्
पूर्णश्रीरघुचन्द्रउत्तमगुरुर्नित्यं हरेन्मे तमः ॥
जो सर्व ताप-दुःखादींचे शमन करतो, अंधःकार पळवून लावतो, स्वप्रकाशाने जगाला चेतना प्रदान करतो, सज्जनांच्या मनोकामना पूर्ण करतो, दुष्ट-भ्रमिष्ट-मायावींना पळवून लावतो, जो शांती देतो आणि अनंत कमळाप्रमाणें असलेल्या सद्भक्तांचा संसारातील दुःखांचा नाश करतो असा तो सर्व गुणैश्वर्य युक्त (चंद्रा प्रमाणे असलेला) उत्तम गुरुवर्य रघुचन्द्र तीर्थ माझ्यातील (दोष आणि दुर्गुणरूपी) अंधःकाराचे नित्य हरण करो.
__________
अशा या महान गुरुवर्यांच्या पुण्यदिनी त्यांचे स्मरणपूर्वक त्यांचा हा संक्षिप्त चरित्ररूपी महिमा वाचून आम्हा सर्व भक्तवर्गावर हरि-वायु-गुरूंची कृपादृष्टी होवो अशी श्रीचरणीं नम्र विनंती.
__________
स्रष्टुमष्टौ मठान्येन महान्यत्नः कृतोऽपि सः ।
विष्णुना चोदितस्त्यक्तो रघुचन्द्रगुरुं भजे ॥
__________
विष्णुः सर्वोत्तमः सेव्यो।
वायुर्जीवोत्तमोऽपि वः ।
✒️मूळ इंग्रजी लेख: श्री. विष्णु वेंकटदास शानभाग, कलबागकार, कुमटा
✒️मराठी लेख: विजयेंद्र आचार्य, मुंबई
No comments:
Post a Comment